लातूर मनपा निवडणूक : दोन दिवसांत ५१३ अर्जांची विक्री, दाखल एकही नाही.
लातूर : लातूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी उमेदवारी अर्ज विक्रीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. निवडणूक प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी, २४ डिसेंबर रोजी शहरातील विविध प्रभागांमधून तब्बल ३६९ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली. पहिल्या दिवशी १४४ अर्जांची विक्री झाली होती. त्यामुळे दोन दिवसांत एकूण ५१३ अर्जांची विक्री झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मात्र, विशेष बाब म्हणजे आतापर्यंत एकही उमेदवारी अर्ज प्रत्यक्ष दाखल झालेला नाही. राजकीय पक्षांकडून एबी फॉर्म मिळण्याची प्रतीक्षा आणि आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू असल्याने इच्छुकांनी अर्ज खरेदीवर भर दिला असून, दाखल प्रक्रियेत मात्र शांतता आहे.प्रभागनिहाय पाहता, प्रभाग १३, १४ आणि १५ मध्ये सर्वाधिक ९८ अर्जांची विक्री झाली असून येथे उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
त्यापाठोपाठ प्रभाग १, २ आणि ३ मध्ये ७० अर्जांची विक्री झाली आहे. सर्वात कमी प्रतिसाद प्रभाग १६ ते १८ मध्ये दिसून आला आहे.येणाऱ्या काही दिवसांत राजकीय हालचालींना वेग येईल आणि प्रत्यक्ष अर्ज दाखल होण्याच्या प्रक्रियेत वाढ होईल, असा अंदाज निवडणूक विभागाने व्यक्त केला आहे.
What's Your Reaction?